कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड प्रतिबंधक लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

यावेळी विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत कर्तव्य बजावले असून परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. शिवाय चालक-वाहक वर्गाचा रोज शेकडो प्रवाशांशी संपर्क होत असलेने इतर वर्गाप्रमाणे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्यांना सरसकट कोविड १९ ची लस देणे आवश्यक असून त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन असे सांगून तातडीने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभाग यांना फोन करून कार्यवाहीसाठी सूचित केले. तसेच आजच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र पाठवून कार्यवाही केली जाईल.

संघटनेच्या शिष्टमंडळामध्ये विभागीय अध्यक्ष अनिता पाटील, विजय भोसले, बी आर साळोखे, एस. वाय. पवार, बी. डी. शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.