कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृत्युदरात वाढ झाल्याची गंभीर दखल घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आज (शुक्रवार) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. व्यापारी संघटनांनी त्यांची भेट घेऊन सर्व दुकाने खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. राज्य शासन याबाबत सकारात्मक असून जर पॉझिटिव्हिटी रेट कमी आला तर दुकाने खुली करण्यास परवानगी देता येईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली आहे.  

व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ना. टोपे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की,  लॉकडाऊन काळात अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातून सुटका होण्यासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. तसेच दुकाने सुरु करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा..

यावेळी टोपे यांनी कोल्हापुरातील रुग्णसंख्या वाढ ९.७ टक्के असून यामध्ये घट झाल्यास तसेच परिस्थिती नियंत्रणात आल्यास राज्य शासन सर्व दुकाने खुली करण्याबाबत सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यामुळे व्यापारी संघटनांना आरोग्य मंत्र्यांकडून ‘जर-तर’ च्या उत्तरावर समाधान मानावे लागले. मात्र, व्यापाऱ्यांनी आक्रमक धोरण अवलंबत सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने सुरू करणारच असा इशारा या वेळी दिला.