‘ग्रामीण नळ पाणीपुरवठा’च्या वीज बिलात सवलत द्या : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
85

शिरोळ (प्रतिनिधी) : राज्य शासनाने कृषी पंप वीजधारकांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामीण नळ पाणीपुरवठा वीज बिलांमध्ये सवलत द्यावी अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन आपण केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

ना. यड्रावकर यांनी सांगितले की, महामारी, महापूर, परतीच्या पावसाचा तडाखा एकामागून एक अशा या नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा परिणाम ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर होताना दिसत आहे. अशातच नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांमुळे विद्युत वितरण कंपनीकडून या योजनांचा विद्युतपुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना पिण्याचे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे थकित बिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे तातडीने थांबवावे, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन केली आहे.  यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.