मुंबई (प्रतिनिधी) : जयसिंगपूर शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिरोळ तालुक्याच्या गावागावातून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणानिमित्त शहरात येत असतात. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. या मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची इमारत उपलब्ध नव्हती. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याला यश आले असून जयसिंगपूरमध्ये मागासवर्गीय मुलींसाठी १६.५० कोटींचे नवीन शासकीय वसतिगृह उभारण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

ना. यड्रावकर म्हणाले की, समाजकल्याण विभागाच्या विभागीय आयुक्तांमार्फत जयसिंगपुरात १०० विद्यार्थिनी क्षमता असलेले १६ कोटी ५५ लाखांच्या वसतीगृह इमारतीचे अंदाजपत्रक शासनास सादर केले होते. शासनाने पहिल्या टप्प्यात ७५ विद्यार्थिनींसाठी १० कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल.

या वसतिगृहास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्री यड्रावकर यांनी आभार मानले.