इचलकरंजी (प्रतिनिधी) : वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या यार्न रिवायंंडिंग उद्योगास प्रति युनिट २ रुपयांची वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केली. आज (मंगळवार) मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रथमच वीज दरात सवलत मिळणार असल्यामुळे रिवायंंडिंग उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील अनेक घटकांना वीज दरातील सवलत मिळत आहे. परंतु यार्न रिवायंंडिंग हा उद्योग वीज दर सवलतीपासून वंचित होता. या उद्योगाला वीज दर आकारणी वाणिज्य दराने होत आहे. यामुळे हा उद्योग अडचणीत येत होता. या उद्योगाला सावरण्यासाठी यार्न रिवायंंडिंग असोसिएशनने राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. यड्रावकर यांच्याकडे वस्त्रोद्योगातील इतर घटकांप्रमाणे वीज दर सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मंत्र्यांनी आज या संदर्भात बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला.

बैठकीत वस्त्रोद्योग सचिव पराग जैन व वस्त्रोद्योग संचालक खरात, कक्ष अधिकारी मदने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर या उद्योगाला प्रति युनिट २ दोन रुपये वीज दर सवलत देण्याची घोषणा केली. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. इचलकरंजी शहरातील सुमारे ४५० रिवायंंडिंग उद्योगांप्रमाणे भिवंडी, मालेगाव, विटा येथील रिवायंंडिंग उद्योगालाही या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

या बैठकीस मदन कारंडे, अमित गाताडे, वायडिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र पारीख, सुनील शिंदे, सचिन पाटील, सोमनाथ टकले उपस्थित होते.