कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महाराष्ट्राची निराशा केली आहे. केंद्राकडून राज्याच्या जीएसटीचे ३८ हजार कोटी अद्याप येणे बाकी आहे. मात्र, एखाद्या विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याला त्रास कसा द्यायचा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. केवळ मेट्रोसाठी आर्थिक तरतूद केली आहे. तर दुसरीकडे भरघोस अशी तरतूद आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या राज्यांमध्ये करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांसाठी भरपूर तरतूद करण्यात आली. धोरणांमुळे आर्थिक स्त्रोत आटल्यानंतर वास्तविक ज्या राज्यांचे देणे आहे, त्यावर अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता संपूर्ण देशाला दिलासा न देता केवळ निवडणुकीचा राजकीय हेतू समोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय झाला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निराश करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या ६५ दिवसांपासून दोन लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यावर केंद्र सरकार अद्यापही तोडगा काढू शकलेले नाही. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही.