‘गोकुळ’मध्ये मंत्री मुश्रीफांची भूमिका निर्णायक…!

0
232

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने अखेर गोकुळसह रखडलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नेत्यांच्या पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत. आर्थिक आणि राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ निवडणुकीत कोणता नेता कोणत्या पॅनेलमध्ये असणार, यासंबंधीत चर्चेला ऊत येत आहे. पण गोकुळमध्ये राष्ट्रवादीचे नेत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका यावेळीही निर्णायक ठरेल.

गोकुळमध्ये मोठी आर्थिक उलाढाल आहे. यामुळे एकवेळ आमदारकी नको पण संचालकपद द्या, असा अनेकांचा आग्रह असतो. शिवाय गोकुळमधील मलईगिरी अनेकवेळा चव्हाट्यावर आली आहे. एकदा संचालक झाले की चांगली आर्थिक प्रगती होते, असा समज रूढ झाला आहे. परिणामी संचालक होण्यासाठी रस्सीखेच दिसते. सध्या येथे महाडिकांचे वर्चस्व आहे. त्याला सुरूंग लावण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील जोरदार तयारी करीत आहेत. मुश्रीफांना सोबत घेऊन गोकुळ ताब्यात घेण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

आमचं ठरलयं, आता गोकुळ उरलयं, अशी टॅगलाईन करून पाटील समर्थक तयारीला लागले आहेत. पण अजून गोकुळमध्ये मुश्रीफ काय करणारे हे स्पष्ट झालेले नाही. त्यांनीही पत्ते खुले केलेले नाहीत. ते सावध आहेत. त्यांना माहीत झाले असावे, गोकुळमध्ये मी जाईल तिकडे सत्ता येणार. म्हणून त्यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत मुश्रीफांमुळेच सत्ताधारी महाडिक आघाडीला विजय मिळवता आला.

दरम्यान, पाच वर्षात गोकुळमध्ये मुश्रीफांना डावलून कारभाऱ्यांनी अनेक उद्योग केल्याचे सार्वत्रिक आरोप झाले. त्यामध्ये मल्टिस्टेचा निर्णय घेतला. त्यास मुश्रीफांसह अनेकांनी व्यापक विरोध केला. त्यानंतर तो वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवली. लाखमोलाची नोकरभरती झाली. प्रत्येक संचालकांना नोकर भरतीचे स्वातंत्र्य देण्यात आले. त्यामध्ये उमेदवारांकडून मलई गोळा केल्याचेही आरोप झाले. यापार्श्वभूमीवर यावेळच्या निवडणुकीत मुश्रीफ काय करणार, त्यावर गोकुळची सत्ता कोणाकडे जाणार, हे अवलंबून राहील.