मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे ट्विट बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांना पहिल्यांदा १९ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, सतेज पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर काही जिल्ह्यात कडक निर्बंध लागू लागले आहेत.