गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजच्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून ऑक्सिजन टंचाईमुळे होणारी गैरसोय थांबणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आज (शनिवार) गडहिंग्लज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन वेगळा करून तो टाकीत साठवून पाईपलाईनने तो रुग्णाला पुरवठा करावयाच्या प्रकल्पाचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

 

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबोळी यांनी या प्रकल्पाविषयी तांत्रिक माहिती दिली. यानंतर मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ५० लाख रुपये खर्चाच्या या ऑक्सिजन प्लँटमधून दररोज १०० ते १२० जंबो सिलेंडर भरतील. तिथून तो टाकीत व पाईपलाईनने रुग्णालयात पुरविला जाईल. दोन ड्यूरा सिलेंडरमधून एकूण ४० जंबो सिलेंडर ऑक्सिजन असेल. त्यामधून उच्च दाबाचा ऑक्सिजन पुरवठा मिळेल. तसेच दोन बाय- पॅप ऑपरेटर्सच्या माध्यमातून रुग्णाला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देता येणार आहे. हे मशीन वेंटीलेटरला जोडून कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू करता येतो. कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्णसेवेमध्ये अडचणी यायच्या. आता या प्लँटमुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

या वेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य युवराज पाटील, नगराध्यक्ष सौ. स्वाती कोरी, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेश मुतकेकर उपस्थित होते.