कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आमचे मित्र, आ. पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे. मात्र बैठकीमध्ये झालेल्या अनेक गोष्टी खाजगी स्वरूपाच्या असल्यामुळे त्या जाहीर करणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुरू असलेल्या समझोता एक्सप्रेसच्या विषयावरून मुश्रीफ यांनी पत्रकात हा खुलासा केला आहे.

मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, माझ्यासह आ. पी. एन. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील आम्ही तिघेही सत्तारुढ महाविकास आघाडीचे घटक आहोत. गोकुळ संघासह इतर सर्व संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन त्या लढवाव्यात, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. यामध्ये संघर्ष झाला तर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, या प्रामाणिक भावनेतून एकत्र येण्याच्या माझ्या विनंतीला आ. पी. एन. पाटील यांनी प्रतिसाद दिला व चार बैठका झाल्या. सत्तेत ते असल्यामुळे ते किती जागा देतात, हीच मागणी मी सातत्याने केली.

रविवारी जिल्हा बँकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये आमदार पी. एन. पाटील यांनी स्पष्टपणे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची चारच उमेदवार देण्याची इच्छा असून ती आम्ही बदलणार नाही. कागलमध्ये तुम्हाला घेऊ व माजी आमदार के. पी. पाटील यांना एक जागा देऊ. यावर मी पालकमंत्र्यांचा विषय काढला. त्यावर त्यांनी एखादी जागा त्यांना देऊ, असे सांगितले. यावर मी चर्चा करून तुम्हाला कळवतो, असे सांगितले. मी जे काही भाष्य केले ते सार्वजनिक करणार नाही. 

माझ्या बैठकीच्या बाहेरच्या दालनामध्ये पी. एन. पाटील यांचे सहकारी शिवाजी कवठेकर व सदानंद पाटील-  गडहिग्लज  हे मी व आमदार पी. एन. पाटील यांनी एकत्र यावे, ही प्रामाणिक भावना असल्यामुळे ते प्रयत्न करत होते. त्यांच्यापुढे आमदार पी. एन. पाटील यांचा प्रस्ताव मी जसाच्या तसाच सांगितला.  तेथून शांतिनिकेतन स्कूलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन सदर भेटीची माहिती दिली. मात्र, पालकमंत्री पाटील संतप्त झाले व त्यांनी आपण यामध्ये येणार नाही. तुम्ही कोणाबरोबर जावयाचे तो निर्णय घ्या, असे सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची मते मिळाली नाहीत, असे सत्तारूढ संचालक मंडळाचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षांमध्ये मल्टीस्टेट व गोकुळ दूध संघाच्या अनेक विषयावर आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे पालकमंत्री श्री. पाटील यांना घेऊनच मला निर्णय घ्यावा लागेल, असेही मी आमदार पी. एन. पाटील यांचेसमोर अनेक बैठकांमध्ये स्पष्ट केले आहे. बैठकीमध्ये अनेक चर्चा झाल्या. परंतु; त्या खाजगी असल्यामुळे मी त्या सार्वजनिकरीत्या जाहीर करणार नाही. कारण, प्रामाणिकपणे आम्ही दोघांनी चर्चा केल्या होत्या. आमच्या मैत्रीमध्ये अडचण येण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.