सोलापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन भीमा सहकारी साखर कारखान्याला २० कोटींची मदत केली, हे धनंजय महाडिक यांनी विसरू नये. शेतकऱ्यांना एफआरपी दिली नसल्याने भीमा कारखान्यावर कारवाई झाली आहे. शासनाच्या मदतीची जाणीव न ठेवता धनंजय महाडिक हे राजकीय आकसापोटी चुकीचे बोलत आहेत, असा पलटवार राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.

टाकळी (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धनंजय महाडिक यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याने एफआरपी दिली नाही. म्हणून त्यांच्या कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन केले आहे. असे सांगितले होते.‌

त्यावर ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की, सह्याद्री सहकारी कारखान्याने आजपर्यंत ९२ टक्के शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपीची रक्कम दिली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे काम सुरू आहे.‌ राजू शेट्टी हे कारखान्यावर आंदोलन करण्यासाठी कराड येथे आले नव्हते. शेतकऱ्यांना ऊसबिले मिळवून देण्याच्याबाबतीत माझ्याशी चर्चा करण्यासाठी कराड येथे आले होते. ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत. त्या कारखान्यांवर शासनाने कारवाई केली आहे. त्यामुळे महाडिक यांना वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. महाडिक यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी प्रयत्न करावेत. विनाकारण आरोप करू नयेत.