लखनऊ (वृत्तसंस्था) :  उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेलीत नोव्हेंबर महिन्यात दरोडा पडला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर तो दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले. आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. भूत आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकला असल्याची गोष्ट समोर आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात बरेलीतील नबाबगंजमध्ये एक व्यापारी पत्नी आणि मुलांसह घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. त्याचवेळी सुमारे बारा मुखवटा घातलेले हल्लेखोरांनी त्याच्या घरावर दरोडा टाकला. संपूर्ण कुटुंबाला शस्त्रांच्या जोरावर ओलीस बनवून रोख आणि दागिन्यांसह सुमारे बारा लाखांचा ऐवज लुटला. एसएसपी रोहित सजवान यांनी अनेक पथकं स्थापन करून बदमाशांना पकडण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यान, मित्रांमध्ये आणि टोळीतील सदस्यांमध्ये भूत नावाने प्रसिद्ध असलेल्या फरहानच्या टोळीनेच हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

घटनेला पंचवीस दिवसांनंतर पोलिसांनी या घटनेचा खुलासा करताना भूत टोळीच्या दहा दरोडेखोऱ्यांना अटक केली आहे. तर दोन चोरटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून पाच पिस्तुलांसह लुटलेले दागिने आणि अडीच लाखांच्या रोख रक्कम जप्त केलं आहे.