कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रोमा मॉलच्या गिफ्ट कार्डद्वारे ५० टक्के सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याच्या बहाण्याने  कोल्हापुरातील सातजणांची १४ लाख १ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  या प्रकरणी आविष्कार सुनील पाटील (वय २९) व त्याचे वडील सुनील पाटील (दोघे रा. वरळी, मुंबई) या पिता-पुत्रांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसिफ सैदुल्ला पुणेकर (वय ४९, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील आविष्कार पाटील याने त्याचे वडील सुनील पाटील हे रिझर्व्ह बँकेत नोकरीस असून, त्यांना दिवाळीनिमित्त क्रोमा मॉलचे गिफ्ट कार्ड मिळाले आहे. या क्रोमा मॉलमधून कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ५० टक्के सवलतीने मिळवून देतो, असे सांगून कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील आसिफ पुणेकर यांच्याकडून ३ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. या पाठोपाठ त्याने सर्फराज अब्दुल सत्तार यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये, सतेज अनिल कोरगावे यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये तसेच २ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन, त्यानंतर राहुल निलेश मुगदार यांच्याकडून १ लाख ५७ हजार रुपये, अद्वैत गुलाबराव सरनोबत यांच्याकडून १ लाख ४७ हजार रुपये, मसूद निसार शेख यांच्याकडून १ लाख ४ हजार रुपये व विशाल राजकुमार चंदवाणी यांच्याकडून ९० हजार रुपये असे सात जणांकडून एकूण १४ लाख १ हजार रुपयांची रक्कम आविष्कार पाटील याने सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत घेतली होती.

मात्र त्याने सांगितल्याप्रमाणे कोणतीही वस्तू सवलतीच्या दरात या सात जणांना दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सातजणांच्या वतीने आसिफ पुणेकर यांनी आविष्कार पाटील व सुनील पाटील या दोघा बाप लेकांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.