सोलापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’चे क्‍लस्‍टर बल्‍क कुलरद्वारा दूध संकलन  

0
298

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अकोला (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील श्री. आदर्श महिला सहकारी दूध संस्थेत गोकुळ दूध संघाच्या बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते करण्यात आले. शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे यांच्या अध्‍यक्षतेखाली आणि संघाच्‍या संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. 

यावेळी लिगाडे म्‍हणाले की, १५ हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्‍क कुलरमुळे अकोला परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन होण्‍यास मदत होणार आहे. त्यामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकाप्रमाणेच सोलापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकांचीही प्रगती होणार आहे. भविष्‍यात आणखी बल्‍क कुलर्स तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात सुरू करण्यासाठी गोकुळ दूध संघास सहकार्य करू.

गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले की, गोकुळने सिंधुदुर्ग, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्‍ह्यात दूध संकलन करण्‍यास सुरूवात केलेली आहे. उत्‍तम गुणवत्‍तेमुळे गोकुळच्‍या दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थांना मुंबई, पुणे, कोल्‍हापूर सांगली सातारा, बेळगाव तसेच कोकण विभागामध्‍ये दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. ग्राहकांच्‍या पसंतीस उतरलेले गोकुळ दूध नजीकच्‍या काळात महाराष्‍ट्राच्‍या उर्वरित भागाबरोबरच इतर राज्‍यातील प्रमुख शहरांमध्‍ये विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा गोकुळचा मानस आहे.

यावेळी संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, प्रकाश पाटील, विठ्ठल शिंदे, शेकापचे चिटणीस अशोक शिंदे, माजी जि. प. सदस्‍‍य जगन्‍नाथ शिंदे, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, आदर्श महिला दूध संस्थेच्या चेअरमन राणी चौगुले, संस्‍थेचे सचिव संभाजी चौगुले, संघाचे अधिकारी, आदी उपस्थित होते.