कोल्हापूर (अविनाश सुतार) : सामान्यांच्या पदरात दुधाची ढोरं… संचालकपदाच्या खुर्चीवर नेत्यांची पोरं… करा प्रचार, येऊन येऊन येणार कोण, शेणाची पाटी टाकायला, दुसरं न्हायं कोण…  डेअरीचा ठराव नेता घेतो… शेतकरी गवताचा भारा आणून मरतो…, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. सोशल मीडिया व्यासपीठावर एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचे ‘वॉर’ सुरू असले तरी, दुसरीकडे मात्र, शेतकऱ्यांची अवस्था दाखविणारा प्रचार जोरदार धुमाकूळ घालत आहे.                

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता उमेदवारी मागे घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी, नेत्यांच्या दबावाखाली त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. नेते मंडळी आपल्या घरातच संचालक पद येण्यासाठी आटापिटा करत आहे. यावरून आता सोशल मीडियावरून खिल्ली उडवणारे मॅसेज फिरू लागले आहे. याचीच चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांकडून आपल्याच वारसदारांना उमेदवारी मिळणार असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश नेत्यांच्या वारसदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावरून आता सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली जात आहे.