मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे कायम सोबत राहून पत्रकार परिषद घेत आहेत; मात्र पत्रकार आता या दोघांच्या प्रत्येक हालचालींवरून बातम्या करू लागले आहेत.

एका पत्रकार परिषदेत एक प्रश्न फडणवीसांना विचारल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडील माईक उचलून आपल्याकडे घेतला. दुसऱ्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी हळूच चिठ्ठी मुख्यमंत्र्यांकडे सरकवली. या दोन घटनांवर पत्रकारांनी बातम्या केल्या आणि विरोधकांनीही त्यावर तोंडसुख घेतले. शनिवारी पत्रकार परिषदेत या दोन घटनांचा उल्लेख करून फडणवीसांनी अक्षरशः विनोद केले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी दोघांच्या खुर्च्या काही अंतर लांब होत्या. त्यावर फडणवीस यांनी आपली खुर्ची एकनाथ शिंदेंच्या बाजूला सरकवली. तेव्हा शिंदेंनीही त्यांना जागा करुन घेण्याच्या उद्देशाने खुर्ची सरकवली असता फडणवीस यांनी त्यांना ‘तुमची खुर्ची इकडे करा’ असे हातवारे करुन खुर्ची जवळ घेण्यास सांगितले. त्यावरुन शिंदे यांनी, ‘अजून परत यावरुनही पत्रकार काहीतरी बोलत राहतील’, असे म्हणाले.

तेवढ्यात एका पत्रकाराने ‘सर जवळजवळ बसा’ असे शिंदे यांना सांगितले. त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी, ‘अरे तुम्ही जवळ आल्यावर लांब करता आम्हाला’, असे म्हटले. हा सर्व संवाद ऐकून फडणवीस यांनी, ‘म्हणून आज दोन माईक ठेवलेत’, असे म्हटल्यावर पत्रकारांचा एकच हंशा पिकला. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी आणि कुठलीही चिठ्ठी नाही’, असे म्हटल्यावर अजून हंशा पिकला.