इचलकरंजीतील इएसआय दवाखान्याचे स्थलांतरण रोखावे : श्रमिक संघ, कामगार संघटनांची मागणी

0
53

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील कामगारांसाठी विविध आजार व उपचार यासाठी लाभदायी असणाऱ्या राज्य कामगार विमा योजना सेवा (इएसआय) दवाखान्यात पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देऊन हा दवाखाना स्थलांतरित होण्यापासून रोखावा, अशी मागणी सर्व श्रमिक संघ व विविध कामगार संघटनांच्या वतीने शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांचेकडे केली.

शिष्टमंडळाने नगराध्यक्षांना सांगितले की, शहरातील यशवंत प्रोसेसजवळचा राज्य कामगार विमा दवाखान्यात शहर परिसरातील कामगारांची चांगली सोय व खबरदारी घेतली जाते. याशिवाय निरामय दवाखान्यातही वेळेवर तातडीने उपचार करण्यात येतात. तरीही अन्य काही सुविधांचा अभाव आहे, अशी कारणे सांगून हा दवाखाना शहराच्या बाहेर स्थलांतरित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये असलेल्या या दवाखान्यात तातडीने सोय-सुविधा करून इमारत विस्तार करावा.

या चर्चेत कामगार नेते धोंडिबा कुंभार, आनंद कांबळे आदींनी सहभाग घेतला. या वेळी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील, पाणीपुरवठा समिती दीपक सुर्वे, ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, पुंडलीक जाधव उपस्थित होते. कामगार नेते सुनील बारवाडे, अमित वरुटे, शीतल शहाणे, जगदीश टाकळे यांच्यासह लाभार्थी कामगार उपस्थित होते.