पेठवडगाव (प्रतिनिधी) : तीस टक्के व्याज दराने कर्ज देऊन महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी फसविले आहे. अशा कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या महिलांची मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करण्यासाठी बंडखोर सेना टोकाचा लढा उभा करणार असल्याचे प्रतिपादन बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केले. ते पेठवडगांव येथे बोलत होते.

यावेळी प्रारंभी क्रांतीची मशाल पेटवून महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भटका समाजाला घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल भटका समाज मुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे, कोविड योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र पाटील, डॉ.किरण पाटील, डॉ.शरद दिवे, सुलेमान सुतार, सौरभ पाडळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच सुमारे पंचवीस पदाधिकाऱ्यांनाही बंडखोर सेनेचे निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आवळे म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांचे आर्थिक शोषण केले आहे. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज देऊन आणि त्या माध्यमातून चोवीस ते तीस टक्क्यांनी वसुली करून महिलांना कर्ज बाजारी केले आहे. कोरोनाच्या काळात जबरदस्तीने धाक दाखवून वेळ प्रसंगी महिलांचा अपमान करून त्यांना हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इतिहासात प्रथमच महिलांच्या कर्ज माफीची मागणी केली जात आहे. आजपर्यंत स्वाभिमानाने कर्ज फेडणाऱ्या महिला आज हतबल झाल्या आहेत. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांचे महिलांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे ही मागणी आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून करीत असल्याचे सांगितले.

यावेळी बंडखोर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष शिलेवंत, अस्लम मुल्ला,मधुकर कांबळे,आयेशा बिजली,दिपाली अवघडे, योगिता बागे,वहिदा येनापुरे, बंडखोर सेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा शिवालीताई आवळे, हिम्मत अवघडे, विशाल लोंढे, विकास अवघडे, सुरेश आवळे, अभिषेक भंडारे उपस्थित होते.