शिवाजी विद्यापीठाचा बरद्वान विद्यापीठाशी अवकाश संशोधनाबाबत सामंजस्य करार

‘ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम’बाबत होणार संशोधन

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अवकाशविषयक तंत्रज्ञान आणि ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम (जी.एन.एस.एस.) यांच्या संशोधनात आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. ऑनलाईन पद्धतीने सोमवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या सामंजस्य कराराचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सुरवात जीएनएसएसविषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू नये, तर दोन्ही विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी पुढे येऊन हे शैक्षणिक व संशोधनविषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्याची अधिक उत्तम फळे मिळतील.

बरद्वान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए.के. पाणिग्रही म्हणाले, शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला हा सामंजस्य करार आनंददायी क्षण आहे. या सहकार्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांचा अवकाश संशोधनातील लौकिक निश्चितपणे वाढीस लागेल. काही चांगले संशोधन प्रकल्प या अंतर्गत हाती घेता येतील आणि काही चांगले शोधनिबंधही त्यातून आकाराला येतील.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर बरद्वान विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अभिजीत मझुमदार यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. राजीव व्हटकर आणि बरद्वान विद्यापीठाचे डॉ. अनिंद्य बोस यांनी सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

काय आहे हा करार ?

पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठामध्ये जी.एन.एस.एस. संदर्भात प्रशिक्षण व संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे. अवकाश संशोधनासाठी हे विद्यापीठ विशेष प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र (एस.आर.सी.) हे सुद्धा अवकाश संशोधनासाठी विशेषतः डाटा विश्लेषणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. इस्रोच्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रहाचा रिसिव्हर विद्यापीठाच्या पन्हाळा येथील उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यान्वित आहे. भूपृष्ठीय वातावरणीय बदलांच्या संशोधनाच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे. तसेच, विश्लेषणासाठी आवश्यक असणारी अनेक साधने येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या तसेच भविष्यातील जी.एन.एस.एस. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अभ्यास हा करार करण्यात आला. या कराराअंतर्गत दोन्ही विद्यापीठे एकमेकांना जी.एन.एस.एस. च्या अनुषंगाने शैक्षणिक व संशोधनपर सहकार्य करणार आहेत. डाटा एक्स्चेंजबरोबरच शोधनिबंधांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.