सभासदांचा कौल मान्य : प्रसाद पाटील

0
154

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो; पण सभासदांनी का नाकारले हे समाजले नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली.

सत्ताधारी मंडळींनी केलेला चुकीचा कारभार आम्ही सभासदांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो; पण लाभ दुसऱ्यालाच झाला. सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून, उद्यापासून आमचे संघटनात्मक कार्य सुरूच राहणार आहे. काय जिंकले माहीत नाही; पण वैचारिक लढा, सभासद हितासाठी केलेला २० वर्षे संघर्ष आणि नि:स्वार्थी भावनेने केलेले संघटनात्मक कार्य हरले याची खंत मनात कायम राहील. विजयी झालेल्या सर्व नूतन संचालकांनी सभासद हिताचा व बँक हिताचा कारभार करावा, अशी अपेक्षा आहे.

शैक्षणिक व सामाजिक कार्यासोबतच बँक वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने २० वर्षे संघर्ष केला. त्याच्या जोरावर सभासदांकडे कौल मागितला होता, असे सांगून प्रसाद पाटील म्हणाले, आम्ही बँकेबाबत अभ्यासपूर्ण व सविस्तर मुद्दे मांडले होते. आमच्या पॅनेलने सभासद हिताचा वचननामा जाहीर केला होता. तरीही सभासदांनी उत्स्फूर्तपणे येऊन ‘आप’लं पुरोगामी समविचारी परिवर्तन पॅनेलला केलेले मतदान हे चांगलेच आहे. आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या पॅनेलला मतदान केलेल्या सर्व शिक्षक सभासदांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.