गारगोटी (प्रतिनिधी)  : भुदरगड तालुक्यातील दक्षिण पश्चिम भागात असलेल्या मेघोली धरणाच्या भिंतीना गळती लागून अखेर बंधारा  बुधवारी (दि.१) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फुटला.  बंधाऱ्याचे आउटलेट आहे, त्या शेजारून बंधारा फुटल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. पाण्याच्या प्रवाहातून नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते  (वय ५५) वाहून गेल्या.  तर ४ म्हशी, १ बैल वाहून गेला असून शेतजमिनीचे मोठे नुकसान  झाले आहे. घटनास्थळी आज (गुरूवार) सकाळी तहसिलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व राजकीय नेते दाखल झाले आहेत. 

मेघोली येथील तलाव फुटल्याने परिसराला जबर तडाखा बसला  आहे. तलावाची गळती वेळेत काढली नसल्याने हा अनर्थ घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  तलावाच्या मुख्य गेटलाच भगदाड पडले व हा अनर्थ घडला.  हा प्रकार रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तलाव फुटल्याची बातमी रात्री अकराच्या दरम्यान सोशल मीडियावर झळकू लागली. आणि या परिसरातील आणि नदीकाठावरील गावातील लोक भयभीत झाले.  पाणी किती,  कोठे आहे?  याची विचारणा होऊ लागली. आणि एकच गोंधळ उडाला.  येथील स्थानिक रहिवाशी सांगतात की, पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की यामध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली.  यात मेघोली,  नवले,  सोनुर्ली, ममदापूर,  वेंगरूळ  या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्याकाठची जमीन, पिके वाहून गेली.  वेंगरुळ,  शेणगावात पाणी शिरले.

नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते  (वय ५५) या  महिला वाहून गेली.  तिचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधून काढला.  या दरम्यान सदर महिला व पती,  मुलगा,  नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी काही जनावरे सोडली  पण पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले. परंतु आपली आई वाहून गेल्याचे या मुलांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले.  मोहिते आपल्या कुटुंबासह कसेबसे बाहेर पडले. परंतु त्यांचा १ बैल, ३ म्हैशी, अशी ४ जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडली आहेत. घरे कोसळली आहेत. काही मोटरसायकलीही वाहून गेल्या आहेत.

तलाव रात्रीचा फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तब्बल २ किलोमीटरपर्यंत येत होता. ओढ्याचे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. शेणगांव येथील नदीकाठावरील या पाण्याचे निरीक्षण करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, रात्री सव्वाबाराला नदीपात्रात दहा फूट उंचीने पाणी वाढले. शेणगावात पाणी शिरले. पात्रातून ऊस पीक वाहून जात होते.  पाण्याबरोबर केळीची झाडे,  कचरा,  लाकडे आदी वाहून जाताना दिसत होते. रात्री सव्वाएक नंतर पाणी उतरू लागले.  वेंगरूळ गावात पाणी शिरले,  शाळेजवळची गल्लीतील लोकांना बाहेर काढले. शेळोलीच्या वक्रतुंड मत्स्यव्यवसाय संस्थेने हा तलाव मासेमारीसाठी घेतला होता. त्यांचे कित्येक लाखांचे नुकसान झाले  आहे.