मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या होत्या. परंतु, यास सुमारे ७ महिन्यांचा कालावधी उलटला असून, हद्दवाढीसंदर्भात मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी, ही कोल्हापूर वासीयांची गेली कित्तेक वर्षांची मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. मी सन २०१६ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर हद्दवाढी साठी आमरण उपोषण केले आहे. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे कोल्हापूर शहरास प्राधिकरण मंजूर झाले. परंतु, प्राधिकरणाचे काम पूर्णत: ठप्प असल्याने शहराचा विकास खुंटला आहे. तसेच बांधकाम परवान्यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

तरी हद्दवाढ प्रस्तावावर महापालिका प्रशानाने कोणती कार्यवाही केली, याचा आढावा घेण्याकरिता मंत्रालय स्तरावर संबंधित सर्व अधिकारी यांच्यासोबत तातडीच्या बैठकीचे आयोजन करावे. यात हद्दवाढी संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.