गारगोटी (प्रतिनिधी) : कोंबड्यांच्या मानमोडी आजारावर उपयुक्त असणारे भाताच्या पिकाचे देवभात नावाचे जंगली वाण भुदरगड तालुक्यात आढळले आहे. येथील प्रसिद्ध असणाऱ्या म्हातारीच्या पठारावर वन विभागाचे वनपाल अमोल चव्हाण, बेगवडेचे वनरक्षक किरण पाटील, वनमजूर दत्ता जाधव यांना हे वाण आढळले.

अमोल चव्हाण म्हणाले की, किल्ले भुदरगडच्या येथील हा विस्तीर्ण म्हातारीचा पठार जैव विविधतेसाठी प्रसिध्द आहे. या भागातील वन्यजीवांचे हे विहाराचे पठार आहे. नेमके याच पठारावर हे देव जातीचे भाताचे जंगली वाण सापडले आहे. सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर फार कमी ठिकाणी अती पावसाच्या ठिकाणी हे जंगली वाण पाणथळीला सापडते. याचे बियाणे शेतात लावता येत नाही. हे वाण कोंबड्याच्या मानमोडी आजारावर याचा प्रामुख्याने उपयोग केला जात होता. जंगलांच्या पठारावर लागणाऱ्या आगीमूळे या दुर्मिळ औषधी संपुष्टात आली आहे.