पाटणा (वृत्तसंस्था) : वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पहिल्या प्रचारसभेत केली. तसेच बिहारमध्ये एनडीएचेच सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या प्रचाराला सुरुवात केली. सासाराममध्ये त्यांची पहिली सभा पार पडली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या शिक्षणव्यवस्थेत बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून प्रेरणा घेऊन आता वैद्यकीय, अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा प्रयत्न असेल.

दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. या प्रादेशिक भाषांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंदर्भात ट्वीट करुन ही माहिती दिली. यापूर्वी ही परीक्षा इंग्लिश, हिंदी आणि गुजराती या तीनच भाषांमध्ये घेण्यात येत होती. आता प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येते. देशातील २२ प्रादेशक भाषांना प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. कोणीही भाषा लादायचा किंवा इंग्लिश भाषा नको असाही उद्देश नाही. परंतु भाषा निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवे आणि शिक्षणात भाषा ही अडथळा ठरु नये असा यामागील उद्देश असल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.