कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूचा हॉटस्पॉट तयार झालेला आहे. पाडळकर वसाहतीमधील संभाजीनगर (कामगार चाळ), शिवाजी पेठ (कामगार चाळ), जरगनगर, रामानंदनगर आदी  ठिकाणी प्रत्येक घरात एक रुग्ण सापडत आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यू, चिकन गुनिया सारख्या रोगांना सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेने अतिरिक्त आयुक्त  नितीन देसाई यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचरा उठाव वेळोवेळी होत नाही. सर्वत्र दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे.  प्रशासनामधील आरोग्य विभागातील मुकादम, आरोग्य निरिक्षक, सफाई कर्मचाऱ्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे जंतूनाशक फवारणी केली जात नाही. अनेक साफसफाई कर्मचारी तसेच आरोग्य निरिक्षक काम करताना दिसत नाहीत नेमणूक केलेल्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अधिकारी नेमके काय करतात हे समजायला मार्ग नाही. सर्वसामान्य नागरीकांकडून विविध सेवा कर महानगरपालिका प्रशासनाकडून आकारले जातात. पण  सेवा-सुविधांचा त्या पद्धतीने लाभ मिळताना दिसत नाही.

तरी साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना कराव्यात. या गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्वसामान्य कोल्हापूरच्या करदात्यांना दिलासा द्यावा. अन्यथा उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी गणेश लाड, राहुल नाईक, अजित पाटील, किरण गायकवाड, निलेश आजगावकर, सागर टिपुगडे आदी उपस्थित होते.