पोटनिवडणूक ‘मविआ’ एकत्र लढणार : नाना पटोले

0
26

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीतील निकालाने आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने कसबापेठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या आजच्या झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत कसबापेठची पोटनिवडणूक गांभीर्याने लढण्याबाबत चर्चा झाली. या मतदारसंघातून सहा इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, त्यांची नावे दिल्लीला पाठवून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

येत्या २६ फेब्रुवारीला पुणे जिल्ह्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आज काँग्रेसने बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली.

कसबापेठ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून, महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी अशी आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हाय कमांडकडे पाठवली जातील आणि त्याचा निर्णय घेतला जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाबद्दल काँग्रेस पक्षाचे धोरण आणि निर्णय चुकलेले नाही. योग्य आणि सविस्तर चर्चा करूनच नाशिकचा निर्णय घेतलेला होता. पक्षाला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला उत्तर देऊ. डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला होता; पण डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्याक्षणी काँग्रेस पक्षाशी विश्वासघात केला. भाजपने दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचे काम केले आणि जनतेने त्यांना धडा शिकवला आहे, असे पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.