मटकाकिंगच्या भावानेच दिली वहिनीसह तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी…

0
147

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने मटकाकिंग सुरेश भगत याची पत्नी आणि तिची बहिणीच्या हत्येची ६० लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून सुरेश भगत याच्या भावानेच या दोघींच्या हत्येची सुपारी दिल्याची खळबळजनक माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील मटकाकिंग सुरेश भगत याची काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली. त्याची पत्नी जयासह काहीजणांना याप्रकरणी शिक्षा झाली आहे. जया भगत आणि तिची बहीण सध्या जामिनावर बाहेर आहेत. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्यानं या दोघींच्या हत्येची ६० लाखांची सुपारी लंडन येथील मामू नावाच्या एका व्यक्तीला दिली. मामूनं उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती.

बिजनौरच्या आरोपींनी अहमदाबाद आणि मुंबई येथील आरोपींच्या मदतीनं जया भगत आणि तिच्या बहिणीची रेकी केली होती. पण हत्या करण्याआधीच मुंबई क्राईम ब्रँचनं विनोद भगतसह ३ आरोपींना अटक केली. आरोपीकडून देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. नंतर पोलिसांनी बिजनौर येथून एक तर गुजरातमधील पालनपूर येथून एक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. लंडन येथील आरोपी फरार आहे.