नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे २:४५ च्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.  जखमींवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तर वैष्णोदेवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

काही जणांमध्ये वाद झाल्यामुळे लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.  त्यानंतर चेंगराचेंगरी झाली,  अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.