मुंबई (प्रतिनिधी) :  ‘मास्टर’  फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे  घर बाँबने उडवणार असल्याचे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यामध्ये चेन्नईतील विजयच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकाऱ्यांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी धाव घेतली. मात्र, बॉम्ब शोधक पथकाला तिथे कांहीही सापडले नाही. मात्र, कॉलच्या आधारे शोध घेतल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम जिल्ह्यातील मार्कनम येथील एस भुवनेश्वरन असे या व्यक्तीचे नाव आहे. विजयच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित कुमार यांना असाच धमकीचा फोन केला होता.