मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गोवरच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. राज्यभरात साडेसहा हजार गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५०३ रुग्णांना गोवरची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. मुंबई, भिवंडी आणि मालेगाव येथे मोठ्या प्रमाणत गोवरचे रुग्ण आढळून आले आहे.

मुंबईमध्ये शुक्रवारी गोवरच्या संशयित रुग्णसंख्या २ हजार ८६० झाली असून, १७३ रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर आणखी एका बाळाचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या नऊ झाली आहे. त्यामुळे राज्यभरात कोविडसारखाच गोवरचा संसर्ग होत आहे का, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत आढळून आलेल्या बहुतांश रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झाल्याचे दिसून आले आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार असून, लसीकरणामुळे तो टाळता येतो. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

भारत सरकारने गोवर आणि रुबेला हे दोन्ही आजार हद्दपार करण्याचे ठरवले आहे. हे उद्दिष्ट अगदी जवळ आलेले असताना राज्यात गोवरची रुग्ण संख्या वाढत आहे. फक्त राज्यात नव्हे तर भारतातही याचा उद्रेक होत असून, ते आत्ता ५ पटीने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळून आलेले आहे. त्यामध्ये ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याची माहिती प्रदीप आवटे यांनी दिली.