रायगड (प्रतिनिधी) : राज्यपालपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने जर शिवरायांबद्दल अशाप्रकारे वक्तव्य केले असेल तर गप्प बसणार का? आझाद मैदान फार लांब नाही, लवकरच एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानात राज्यपालांविरोधात मोर्चा काढणार अशी घोषणा खासदार उदयनराजे यांनी केली आहे.

‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे आज रायगडावर दाखल झाले असून त्यांनी शिवरायांच्या समाधीला वंदन केले. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना उदयनराजेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली. तसेच, भाजपवरही निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचा आदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

मी संपूर्ण राज्यभर फिरुन मी सर्वधर्म लोकांशी बोलणार आहे. आता आझाद मैदान लांब नाही. लवकरच तारीख ठरवून आझाद मैदानावर जायचे आहे, अशी गर्जना राज्यसभेचे खा. उदयनराजे भोसले यांनी रायगडावरून केली. ते म्हणाले, स्वार्थी लोकांमुळे देशाचे तीन तुकडे झाले; पण देशाचे आता ३० तुकडे होतील. आत्ताचे जे नेते मंडळी सांगत आहेत ती सर्व धर्म समभावाची संकल्पना नाही. ही लोक प्लॅनिंगने चालत आहेत. ते शिवाजी महाराज यांचे नाव कमी लेखनाचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाविरोधात उदयनराजे यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केले आहे.

शिवरायांनी सर्वधर्मीयांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचे काम आहे. शिवरायांनी आपले आयुष्य राज्यासाठी वेचले. त्यांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. शिवरायांना वंदन करायचे पण त्यांनी दिलेल्या सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला जात नाही. राजकीय पक्षांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे, अशी टीका उदनयराजेंनी केली.