मराठी फलकास फासले काळे…

0
56

बेळगांव (प्रतिनिधी) : मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकास काही कन्नड भाषिकांनी काळे फासले. आज (शुक्रवार) सायंकाळी हा प्रकार घडला आहे. काळे फासलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री येडीयुराप्पा, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र होते. यामुळे घटनेमुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गळ्यात लाल आणि पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणांनी हे कृत्य केले आहे. त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते चित्रण समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. आमदार अभय पाटील यांच्या छायाचित्राला काळे फासण्याची सूचना चित्रण करणारा तरूण देत होता. वर्दळीच्या ठिकाणीच हा प्रकार घडत असताना त्याला कोणीही का आक्षेप घेतला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनेमुळे बेळगाव शहरात पुन्हा भाषिक तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणची स्थापना झाली तर १४ रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्यातील कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेवर आक्षेप घेतला. ५ नोव्हेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.