मुंबई (प्रतिनिधी) :  मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे आज (रविवार) वयाच्या ५८ व्या वर्षी  निधन झाले. त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत अभिनय केला आहे.

तसेच त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विशेषतः ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटके तुफान गाजली होती. यासोबतच त्यांची ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती.