कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत खोटी परिपत्रके काढून मराठा समाजाची फसवणूक आणि दिशाभूल केली आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची योग्य कार्यवाही केली नाही. याच्या निषेधार्थ मराठा आरक्षण संघर्ष समितिच्या वतीने शुक्रवार (दि. २५) जूनरोजी मुंबई येथे मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गोलमेज परिषद घेणार असल्याची माहिती, समितीचे प्रमुख सुरेशदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुरेशदादा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत राज्य सरकारवर दबाव आणल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. म्हणूनच घेण्यात येणाऱ्या या गोलमेज परिषदेमध्ये एकुण चौदा विषयांवर सरकारची पोलखोल केली जाणार आहे. या परिषदेसाठी केंद्रीय, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आ. नरेंद्र पाटील, आ. प्रसाद लाड, रमेशदादा पाटील यांच्यासह इतिहासतज्ज्ञ तसेच मराठा समाजाच्या ४२ विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी विजयसिंह महाडिक, भरत पाटील, जयदिप शेळके, शिवाजीराव लोंढे, सचिन साठे, मारुती जांभळे, विकास साळोखे, अनिकेत आयरेकर आदी उपस्थित होते.