‘पुण्यात आम्ही पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार…’

0
49

नवी मुंबई (प्रतिनिधी) : पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबतच्या मागणीची दखल घेत नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलणे भाग असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देऊन कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला राज्य आणि केंद्राच्या सुविधा मिळत नाहीत. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन
करणार ? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावलले जात आहे. पंतप्रधान मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्या वेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा समस्यांचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार आहोत.