पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित राहिला आहे. अद्याप आरक्षणावर ठोस तोडगा काढण्यात सरकारला यश आलेले नाही.  कोणत्याही सरकारला यावर ठोस निर्णय घेत आलेला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर आपापल्या वाहनातून धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी आज (रविवार) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महावितरणमधील भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना संधी मिळाली नाही. त्याच्या निषेधार्थ १ आणि २ डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहेत. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. पण काही कारणास्तव  अधिवेशन लांबणीवर पडल्यास पुढील निर्णय लवकरच जाहीर करू, असे कोंढरे यांनी यावेळी सांगितले.