ठाणे (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करा, असा आदेश ठाण्यातील सत्र न्यायालयाने एटीएसला आज (बुधवार) दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश दिल्यानंतरही महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. त्यानुसार सत्र न्यायालयाने एटीएसला आदेश दिले आहेत.

या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे आणि त्यासोबतच अटक केलेले दोन आरोपी, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर, या दोघांना देखील एनआयएच्या ताब्यात देण्याचे आदेश  न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अप्रत्यक्ष संघर्ष  सुरू झाला होता. अखेर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत.