हत्या करून मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये फेकला : देवेंद्र फडणवीस  

0
17

मुंबई (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आला. हा खून सचिन वाझे यांनीच केला असून त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) विधानसभेत केली.

संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा, अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा, असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का केलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली.

२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर दिवसभर सचिन वाझेंसोबत होतो, असे मला त्यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घऱी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वाझे यांची स्वाक्षरीदेखील आहे, असे तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.