कोल्हापूर (प्रतिनिधी) : मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक कॉलनी परिसरात अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग बोंद्रे याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याला आज (शनिवार) न्यायालयासमोर हजर केले असता  ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मानसिंग बोंद्रे याने १२ डिसेंबररोजी रात्री रंकाळा परिसरात अंबाई टँक कॉलनी परिसरात अंदाधुंद गोळीबार केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी मानसिंग बोंद्रे याचा चुलत सावत्र भाऊ अभिषेक बोंद्रे याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दसरा चौकातील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि शेत जमिनीच्या मालकी हक्कावरुन मानसिंग बोंद्रेने आपल्या दिशेने गोळीबार केल्याची तक्रार अभिषेक बोंद्रे याने केली होती.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर मानसिंग बोंद्रे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर एका महिन्यानंतर त्याला आंबा घाट परिसरातून शुक्रवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.