टोप (प्रतिनिधी) : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील मनपाडळे हायस्कूलचे संस्थाध्यक्ष असणाऱ्या मुख्याध्यापकांनी ३ महिन्यांचा पगार न काढल्याच्या निषेधार्थ आजपासून (सोमवार) मनपाडळे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्याध्यापक मनपाडळे हायस्कूलचे संस्थाध्यक्ष आहेत. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना जनावरे राखणे, शेतातील कामे लावणे, अशी अशैक्षणिक कामे ते लावतात. त्यांची वैयक्तिक कामे नाही केल्यास अर्वाच्च शिवीगाळ करतात. तसेच मुद्दामहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लावतात.

दरम्यान, मुख्याध्यापकांनी सर्व कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास देण्याच्या हेतूने जुलै २०२१ पासून पगार काढलेला नाही. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सर्व शिक्षकांनी ३० जुलैरोजी तक्रार दिली आहे. त्याची दखल घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना  सर्वांचा पगार काढण्याचा आदेश दिला होता. तथापि मुख्याध्यापकांनी त्या आदेशाला जुमानलेले नाही. परिणामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.