नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका काँग्रेसने बदलली असून त्यांनी यू-टर्न घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगून माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. आम्ही कृषी क्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आहो उलट काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे, की जे मनमोहन सिंग बोलले होते, ते मोदीला करावं लागत आहे, असे तुम्ही म्हटलं पाहिजे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना आज (सोमवार) बोलत होते.

शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यासाठी कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज आहे. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. या विधानाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. याबद्दल काहीही आक्षेप नसला तरी त्यांनी शेतकऱ्यांनाही मागील अनेक वर्षांपासून असणारी यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे, हे सांगणं महत्वाचे होते. काँग्रेस माझं ऐकणार नाही, किमान मनमोहन सिंग यांचं तर ऐकेल असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.