आंबा येथील मंडल अधिकाऱ्याने केली लाचेची मागणी : दोघांवर गुन्हा दाखल

0
41

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथील   तक्रारदाराकडून शेत जमिनीवर वारसा नोंद मंजूर करुन पुढील कार्यवाहीसाठी ५ हजारांची लाच मागितली. याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यासह पंटरवर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष सांगडे (मंडल अधिकारी आंबा ता.शाहुवाडी) आणि पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा.विशाळगड, ता.शाहूवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर पंटर मुबारक मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतलयं. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबा येथील तक्रारदार यांचे वडील मयत झाल्याने त्यांनी सातबाऱ्यावर वारसा नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान वारसा नोंद केली म्हणून पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकारी संतोष सांगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंटरकरवी ५ हजारांचा लाचेची मागणी केली. त्यामुळे याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची चौकशी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंडल अधिकारी संतोष सांगडे आणि पंटर मुबारक मुजावर या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यांच्यावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंटरला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर,पो.ना.विकास माने,सुनील घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने,पो.हे.कॉ. सुरज अपराध, विष्णू गुरव यांनी केली.