रयतेच्या राजाला मानाचा मुजरा : पन्हाळा गडावर उत्साहात शिवजयंती 

0
206

पन्हाळा (प्रतिनिधी) : भिरभिरणारे भगवे ध्वज… ओसंडून वाहणारा उत्साह… मनामनात शिवप्रेम… सळसळती तरूणाई… जय शिवाजी जय भवानी अशा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष…, अशा शिवमय आणि जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव गडावर उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, गडावर शिवज्योत नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त दाखल झाले होते. शिव मंदिरातून ११५० शिव ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनचे संचित भाडेकर यांनी दिली. सकाळी १० वाजता शिवजन्मसोहळा साजरा झाला. यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता.

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. पण शिवभक्तांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. गुरूवारी रात्री दीडच्या सुमारास पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली. वाहनतळ बुधवारपेठ येथे केले होते.  पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर पालिका कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. गडावरील व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. छोटी-मोठी स्टॉल उभारणी केल्याने जणू यात्रेचे चित्र गडावर पाहावयास मिळाले. संयुक्त शिवजयंती उत्सव समिती पन्हाळा यांच्यामार्फत स्मरणशक्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा व  रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल, उपनगराध्यक्ष शरयू लाड, नगरसेवक, नगरसेविका आदीसह संयुक्त शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.