दसरा चौकात बेकायदेशीर पिस्तुल विक्री करणाऱ्याला अटक  

0
24

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दसरा चौक परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल  विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अक्षय अमर पाटील (वय २३, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत राऊंड असा एकूण ५० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित आरोपी अक्षय पाटील याच्याकडे बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल असून तो विक्री करण्यासाठी २३ सप्टेंबररोजी दसरा चौक परिसरातील केएमटीच्या बंद असलेल्या बसस्टॉपजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी मिळाली होती. त्यानुसार या परिसरात पोलिसांनी सापळा लावून अक्षय पाटील याला ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, पोलीस अंमलदार शिवाजी जामदार, नितीन चौथे, गुलाब चौगुले, अजय काळे, सुनिल कवळेकर, महेश गवळी, रवींद्र कांबळे, ओंकार परव, संजय पडवळ, अनिल जाधव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व महिला पोलीस अंमलदार निलम कांबळे यांनी केली.