कोलकाता : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाइकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. त्यामुळे मृतदेहांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजही लावणे कठीण आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.
पाहता पाहता रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा आता २०७ वरून २८८ वर पोहचला आहे. आतापर्यंत ९०० लोक जखमी आहेत अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील लोकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आणि राज्यातील पीडितांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.