कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. नंदिग्राममध्ये ४ ते ५ जणांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. परंतु या घटनेवेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी नेमके काय घडले, याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे ममता यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नंदिग्रामच्या बिरूलीयामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाला असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता यांना कोलकाताच्या एसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.  त्यांच्या पायाला फ्रॅक्चर  झाले असून या प्रकरणी  निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. परंतु या सर्व प्रकरणात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी वेगळा खुलासा केला आहे. ममता बॅनर्जी या सभेसाठी आल्यानंतर  त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सभा संपल्यानंतर गर्दीमध्ये काही लोक खाली पडले. त्या वेळेला  ममता बॅनर्जी गाडीतून निघाल्या असता गाडी जवळ कोणीही उपस्थित नव्हते.  तसेच कोणीही त्यांना धक्काबुक्की केली नाही,  असे सुमन मैती या तरुणाने माध्यमांना  सांगितले.

तर चित्रंजन दास यांनी सांगितले की, सभा संपल्यानंतर ममता बॅनर्जी गाडीत बसलेल्या होत्या पण गाडीचा दरवाजा उघडा असल्यामुळे एका पोस्टरचा गाडीच्या दाराला फटका बसला आणि दार बंद झाले. त्यामुळे कदाचित ममता यांना दुखापत झाली असू शकते. तसेच या सर्व प्रकरणात मी स्वतः पाहिलं की गाडी जवळ कोणीही नव्हतं आणि कोणत्याही व्यक्तीने गाडीचा दरवाजा बंद केला नाही, असेही दास यांनी सांगितले.