कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष कोल्हापूर महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम राबवली जाते. हिंदु धर्मानुसार गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करावी, असे शास्त्र आहे. या धर्मद्रोही उपक्रमामुळे गणेशभक्तांची इच्छा असूनही ते आपल्या प्रथा परंपरा यांचे आचरण करू शकत नाहीत. तरी गणेशोत्सवामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने    महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे यांनी  हिंदूंना त्यांच्या प्रथा-परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी महापालिकेने गणेशभक्तांना शाडूमातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख  राजू यादव, शिवसेनेचे किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, शरद माळी,  बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.