कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद इम्रान प्रतापगढी

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून राज्य भाजपमुक्त केले. त्याप्रमाणे आगामी निवडणुकीत कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा, असे आवाहन कवी व काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. जगात नद्यांचा संगम झाला आहे. परंतु कोल्हापुरात भिन्न धर्म आणि संस्कृतीचा संगम होतो, असेही ते म्हणाले. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन मंगळवार पेठेत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

प्रतापगढी म्हणाले की, भाजपने देशात काँग्रेसमुक्त घोषणा दिली आहे. परंतु मी भाजपच्या मोठ्या नेत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी कोल्हापुरात येऊन पाहावे की, जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपला हद्दपार करून देशात महाविकास आघाडीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आघाडी सरकारचे काम देशातील इतर राज्यांच्या तुलनेत चांगले झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. देशातून काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणाऱ्यांना ही चपराक आहे. कोल्हापुरी चपला, मिरची जगप्रसिद्ध आहे.  याच  मिरचीने भाजपला ठसका देण्याचे काम केले आहे.

प्रास्ताविक आ. चंद्रकांत जाधव यांना केले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. ऋतुराज पाटील, आ. प्रा. जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अभय छाजेड, काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पवार, काँग्रेस महिलाध्यक्षा संध्या घोटणे, माजी महापौर संजय मोहिते, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.