अलाहाबाद (वृत्तसंस्था) : भगवान राम, भगवान कृष्ण देशातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहेत. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय सन्मान देण्यासाठी संसदेमध्ये कायदा करण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका नव्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संसदेत कायदा पारित करण्याचे सुचवले आहे. दरम्यान, राम जन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीवेळी या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात भगवान राम वास्तव्य करतात, अशी टिप्पणी करणाऱ्या देशाच्या धर्मनिरपेक्ष मूल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या या भूमिकेवर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्याविषयी आक्षपार्ह भाषेत फेसबुकवर लिहिणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने ही टिप्पणी केल्याचे वृत्त बार अँड बेंचने दिले आहे. संबंधित व्यक्ती गेल्या १० महिन्यांपासून या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहे. आज त्याला जामीन मंजूर झाला आहे. त्यावेळी  न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने राम, कृष्ण हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.