राज्यपालांबाबत एकदाचा निकाल लावा : शरद पवार

0
9

पुणे (प्रतिनिधी) : जबाबदार पदावर बसून राज्यपाल कोश्यारी हे सतत वादग्रस्त विधाने करत आहे. याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी दखल घेतली पाहिजे. तसेच याबाबत एकदाचा निकाल लावाला पाहिजे, असे स्पष्ट करून महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात गैरसमज निर्माण करणे, हेच त्यांचे मिशन आहे की काय, अशी शंका येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

शरद पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य पाहता आता त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. बुधवारी त्यांनी एक निवेदन काढत शिवाजी महाराजांचे कौतुक केले; मात्र शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर सुचलेले उशिराचे शहाणपण आहे. म्हणून मला स्वत:ला असे वाटते की, याचा निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी लावला पाहिजे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी देणे योग्य नाही.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले, त्या कार्यक्रमात शरद पवार, नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांनी तेव्हाच राज्यपालांचा निषेध नोंदवला नाही, अशी टीका खासदार उदयनराजे यांनी केली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, सर्व कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपालांनी ते वक्तव्य केले. कार्यक्रमात त्यांचे वाक्य ऐकूही आले नाही.

…तर सीमावादावर चर्चा शक्य

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली व सोलापुरातील काही गावांवर दावा केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, आम्हीदेखील बेळगाव, कारवार, निपाणी या गावांवर दावा केला आहे. कर्नाटक सरकारने आधी या गावांवरील आपला दावा सोडावा. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यास हरकत नाही; मात्र तुम्ही बेळगाव, कारवार, निपाणी या गावांवरील दावाही सोडणार नसाल आणि वर इतर गावांविषयी दावा करत असाल, तर ते महाराष्ट्राला मान्य होण्यासारखे नाही.